Friday, 27 September 2019

स्पेशल आशीर्वाद!




अतुलने  वाईनचा ग्लास भरला व गॅलरीत जाण्यासाठी वळला, पण गॅलरीच्या दारात येताच, तो थबकला. नेहा आरामखुर्चीत बसनू आकाशाकडे एकटक बघत होती.  एकतर रात्र ही बरीच झाली होती व गॅलरीत लाईटही लावला नव्हता व नेहा गाढ विचारात एवढी हरवली होती की अतुल तिच्या जवळच्या खुर्चीत येऊन बसला तरी तिला अजिबात हासभासही नाही लागला.
अतुलही शांतपणे  वाईनचे घुटके घेत बसला उगाच तिच्या तंद्री मध्ये भंग नको म्हणून.

काळ्याभोर आकाशात चमचमणारे, लुकलुकणारे असंख्य तारे होते पण चंद्र मात्र नव्हता. तेवढ्यात एक तारा निखळला व वेगात जमीनीकडे झेपावला.
तिला आठवले....
प्रत्येक वेळेला तारा निखळून तिच्या ओंजळीत येई, तिच्या नसानसातून प्रवास करत तिच्यामध्ये एकरूप होई पण प्रचंड दुखाःने  प्रत्येक वेळेस तिला त्या ईटुकल्या तारयाला परत आकाशात ठेवावे लागे!

नेहाने अतीव दुखाःने डोळे मिटले.

तीन असफल आई.व्ही. एफ (I.V..F.)! व आई होण्याची जबरदस्त इच्छा ! आतापर्यंतचा तिचा प्रवास तिच्या डोळ्यासमोर एखाद्या चित्रपटासारखा तरळू लागला.
............................................................
अतुल व नेहाला दोघांनाही मुलांची आवड, म्हणून लग्नानंतर प्लानिंगचा विचार केलाच नाही. पहिले वर्ष लग्नाच्या नवलाईत सरले. दुसरे व तिसरेही करीयरच्या मागे सरले. आता मात्र नेहा जरा काळजीत पडली. दोघांच्या तपासण्या केल्या.  रीपोर्टस सांगत होते...  Unexplained infertility. डॉक्टरांनी दिलेले सल्लेही नीट पाळले. मग असे का? 
अनेक स्पेशालिस्ट कडे खेटे ही घातले. अखेर डाॅक्टरांच्या सल्ल्याने दोघांनी  जाणिवपूर्वक निर्णय घेतला..
पहिला I.V.F..
मानसिक तनाव, पैशाची तरतूद व शारीरिक त्रास! डाॅक्टरांनी ही व्यवस्थित माहिती दिली होती की ही treatment successful होईलच ह्याची शास्वती नाही.
पण आशा वेडी असते नं..
जेव्हा पहिल्यांदा यश नाही आले तर नेहाला आभाळच कोसळतय असे वाटले़. डाॅक्टरांनी कितीही समजावले तरी तिला असेच वाटले की कदाचित तिच्या चुकीमुळेच  अपयश आले.
"मी आराम नाही केला वाटत. मी खाण्यापिण्याची योग्य काळजी घेतली नाही का?" असेच विचार तिच्या मनात येई.
"नेहा, तुझे हाल मला बघवत नाहीत. आपण दत्तक घेऊ."
"प्लीज अतुल, इतक्यात  दत्तक घेण्याचा विचार नको. मला अजून जरा थांबायचे आहे"
अतुलचा भक्कम आधार होता म्हणून  आणखी 2 वेळा  I.V.F. पण मानसिक व शारीरिक वेदनेशिवाय पदरी काहीच नाही. आता नेहा फारच निराश झाली. मनाने व शरीरानेही खंगली.
"लग्नाला 9 वर्षे झाली ना ग, नेहा आमचे गायनॅक खूप अनुभवी आहेत, त्यांच्याकडे जा." बारसे असो की कुठलाही समारंभ, नेहा प्रश्नांच्या भडीमाराने हैरान होई. हळूहळू ती अशा ठिकाणी जाणेच टाळू लागली.
समाजात वावरताना, एक यशस्वी, करारी करीयर करणारी महिला, पण खासगी आयुष्यात मात्र आई होण्यासाठी हळवी व्याकुळ झालेली!
.....................
बराच वेळ झाला, नेहा डोळे मिटून आपल्याच विचारात हरवली होती. अतुलने अलगद नेहाच्या खांद्यावर हात ठेवला.
नेहाने दचकून डोळे उघडले.
"नेहा, मी  वेगवेगळ्या संस्थेचे फाॅमस आणले आहे, उद्याच आपण दोघांनी  भरुन दयायचे आहेत. आपल्याला त्यांचा कॉल आला की मग बघ आपले आयुष्यही कसे बदलून जाईल. अग, अशी असंख्य बालक आहेत, ज्यांना आईच्या कुशीची गरज आहे."
 नेहाने गदगदून विचारले. "का, देवाने मला एक ही बाळ दिले नाही? मी काय पाप केले म्हणून मला वांझोटीचा शाप मिळाला?   खरच मी कधीच आई नाही होणार का?
"नक्कीच होणार, आपल्यासारखे आई व बाबा special असतात. कारण आपला जन्म ही ह्या (special )खास कारणासाठीच तर झालाय. आपण एका निष्पाप बाळाला आपलेसे करुन, निदान एकातरी जीवाच्या आयुष्याचे सोने करू. त्या अनाथ  निष्पाप जीवाला आपल्या सारखेच आई-बाबा माया लावणार न नेहा. "वांझोटी" होणे शाप नाहीच मुळी. आपण पुण्यवान आहोत. हव तर असे म्हण देवाने अनाथ बाळाला दत्तक घेण्याचा आपल्याला आशीर्वाद दिला आहे!"
"खूप थकले आहे रे मी, पण तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. आपण वास्तविक आधीच हा निर्णय घ्यायला पाहिजे होता. तुझे ऐकायला  पाहिजे होते. तुझ्या बोलण्याने मला उभारी आली." व नेहाने अतुलच्या मिठीत अश्रूंना वाट करू दिली.
अतुलही तिला प्रेमाने थोपटत म्हणाला, "आपण सगळे प्रयत्न केले नेहा ते बरे झाले, तुझ्या मनाचेही समाधान झाले की प्रयत्नात काही कसुर नाही ठेवली."
................................................
वेगवेगळ्या संस्थेत गेल्यावर, नेहाचा त्या निष्पाप बाळांना बघून जीव गलबलून जाई. 
"अतुल  किती कठोर असतील ती लोक  ज्यांनी या बालकांना सोडून दिले असेल."
 लहान बाळांपासुन 10 ते 13 वर्षापर्यंत मुलांना पाहुन नेहा गहिवरून जाई. एका अवघ्या 1 महिन्याच्या गोंडस बाळाने नेहाच्या मनात घर केले. सर्व पेपर वर्कही पूर्ण झाले. आता फक्त त्यांचा काॅल येणे बाकी होते.
नेहा  बाळाच्या स्वागताच्या तयारीला लागली. बाळाचे कपडे, झबली, बाळाची खोली, पाळणा, कारमध्ये बाळासाठी खास सीट. मना बरोबर घराचाही कायापालटच केला. उत्साहाला नुसते उधान आले होते. नेहा एक-एक दिवस मोजत होती..
त्यांच्या काॅलची वाट बघणे म्हणजे संयमाची परीक्षा जणु, पण या वेळेस सुखद निकालाची 100 टक्के खात्री होती.
............................................................................
5 महिन्यांनी.....
आजही नेहा गॅलरीत बसली होती. अतुल आजही वाईनचा ग्लास घेऊन गॅलरीत येताच थबकला. नेहा आजही आकाशाकडे बघत होती. काळ्याभोर आकाशात चमचमणारे, लुकलुकणारे असंख्य तारे होते, हयावेळेसही चंद्र आकाशात नव्हता कारण तो आज तिच्या कुशीत होता..
ईवलेसे  गोंडस तान्हे बाळ, घारे लुकलुकणारया डोळ्यांनी आपल्या आईला बघून गालाला खळी पाडून हसत होते . आपल्या ईटुकल्याश्या हाताने तिच्या बोटाला घट्ट पकडून  मायेच्या कुशीत निश्चिंत होऊन विसावले होते. 
अतुलही ते  द्दश्य अनिमिष नेत्रांनी बघत राहिला.
"अरे अतुल, आज मला समजले देवाने मला "special आई"  होण्याचा आशीर्वाद दिला आहे!"
........................
खरंच, आज अश्या अनेक स्त्रिया आहेत ज्यांना स्वतःचे मुल होऊ शकत नाही. पण त्याहुनही अधिक अशी बालके आहेत ज्यांना आई हवी आहे व हवी आहे फक्त मायेची ऊबदार कुशी!
..............................................................
वाचकांनो,
लेख आवडलयास लाईक करावे व आपली प्रतिक्रिया ही जरुर द्यावी. मला फॉलोही करायला विसरू नका!
..............................................................
सदर लेखाच्या वितरणाचे व प्रकाशनाचे सर्व अधिकार लेखिकाकडे राखीव.
लिंक शेअर करायला हरकत नाही, पण पोस्ट चोरून/ काॅपी करून स्वतःच्या नावाने वेगवेगळ्या ग्रुपस/whatsapp/ किंवा इतर ठिकाणी प्रसिद्ध /पोस्ट केल्यास  काॅपी राईट कायद्याचे उलंघन समजून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. धन्यवाद!